सेवेचे उद्दिष्ट

इंटरनेटवरुन शोध घेतल्यास जगभरातील विभिन्न लोकांना विविध हेतूंनी आणि कारणास्तव मदत करणार्‍या असंख्य सेवाभावी व अशासकीय संस्थांची यादी मिळेल. निराधार व बेघर असे सैनिक आणि असैनिक, स्त्रियां, मुले, नवजात शिशु व गर्भ, अपंग आणि असाधारण अशा अनेक समस्याग्रस्तांसाठी या संस्था कार्य करताना आढळतील. प्रयोजन किंवा हेतू काहीही असो, चांगल्या कार्याला वाहिलेल्या अशा संस्थाचे कार्य एकमेकांस आंशिक किंवा संपूर्णपणे पूरक असे असून एकूण मानव समाजाला कल्याणकारक असे ठरते. प्रत्येक संस्थेचे कार्य, भलेही ते मर्यादित असो, आपल्या जागी स्वतःचा ठसा उमटवते आणि लोकांच्या भल्यासाठी उपयुक्त ठरते. जासकॅप आपल्या मर्यादित कार्याने का होईना या विस्तृत वर्तुळाचा भाग बनून किमान काही लोकांच्या आयुष्यात फरक व्हावा यासाठी प्रयत्नशील असून अशी आशा करते की ज्यांना अशी मदत मिळाली आहे तेही सहानुभूति आणि हा लोककल्याणाचा संदेश व कृती पुढे नेतील, ज्यामुळे सरतेशेवटी अशी हजारो चांगली कार्ये एकत्र आल्याने आपले हे भौतिक जग आयुष्याच्या दृष्टीने अधिक सुखकर होईल.

मदर तेरेसा यांनी एकदा असे म्हटले होते की, “आपण या पृथ्वीवर जरी फार मोठ्या गोष्टी करु शकलो नाही, तरी पण लहान गोष्टी मोठया प्रेमाने मात्र करु शकतो. आपल्या कार्याच्या व्याप्तिपेक्षा ते करण्यात आपले प्रेम आणि सदभाव किती आहे हे महत्वाचे असते.” कर्करोग हा संपत्ति, लिंग, वय, जात किंवा देश असा कुठलाही भेदभाव न करता कुणालाही, कधीही जडू शकतो. अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तिला कर्करोग झालेला कधी ना कधी पाहिलेला असतो. कर्करोग, पश्चिम तसेच पूर्व देशातील समाजाच्या सर्व घटकांना सतत प्रभावित करताना दिसतो. आम्ही असे मानतो की मानवी आयुष्य चिरंतन ठेवणे, ते मुल्यवर्धित करणे, गरिबांना व अशिक्षितांना शिक्षण व रोजगार तसेच ते कर्करोग पीडित असल्यास त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात तसेच जगभर कर्करोगाचे वाढते प्रमाण आम्हाला चिंतादायक वाटत आहे, आणि भविष्यात लवकरच हृदयरोगाऐवजी कर्करोग मानवी मृत्यूचे पहिले कारण सर्व रोगांत ठरेल. या संभावनीय धोकादायक पार्श्वभूमीवर स्वयंसेवी अशासकीय सेवाभावी संस्था म्हणून कर्करोगाचा प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन याबाबत उपलब्ध असलेली प्रचुर प्रमाणातील माहिती जास्त भाषांत आणि सोप्या मांडणीत लोकांना द्यावी ही आम्ही आमची भूमिका ठरवली आहे. कुठल्याही समस्येबाबत केवळ नियम आणि आदेश काढण्याऐवजी त्याबाबत माहिती देणे व प्रबोधन करणे अधिक उपयुक्त ठरते, असे अंततः दिसून येते.

जासकॅपसारख्या अशासकीय सेवाभावी संस्था अधिक शिक्षित नसलेल्या जनसामान्यांना कर्करोगासंबंधी माहिती व त्याचे निदान आणि उपचार लवकर केल्यास तो बरा होण्याची शक्यता अधिक असते, याबाबत जागृत करुन कर्करोगामुळे निर्माण होणार्‍या स्थितीत लक्षणीय फरक करु शकतात. कर्करोगाचे निदान लवकरच झाल्यास उपचारांचे अनेक पर्याय विचारात घेता येऊ शकतात. हा संदेश लोकांना देणे हे आमचे ध्येय आहे. लवकर उपचार केल्यास आयुष्य वाचू शकते किंवा ते वाढू शकते, आणि त्याचा दर्जा वाढवणे शक्य असते. कर्करुग्णांना सर्वतोपरी मदत करुन कर्करोगाचा सामना करण्यास बळ देणे व अशा सर्व रुग्णांची काळजी घेणे हे कार्य जासकॅप करत आहे.