आमच्याबद्दल

जासकॅप ही स्वयंसेवी, सेवाभावी व ज्ञान-केंद्रित अशासकीय संस्था असून सामान्य लोकांना कर्करोगांचे सखोल ज्ञान व माहिती, जशी की वैद्यकीय तपासण्या, उपचारांचे पर्याय आणि परिणाम, याबाबत समजून घेण्यास मदत करते. भारतामध्ये कर्करोग ही नैसर्गिक शिक्षा किंवा देहदंडाची शिक्षा असे मानणारे अनेक लोक आहेत, पण तसे समजणे बरोबर नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. कर्करोगाचे निदान त्याच्या प्राथमिक अवस्थेत झाल्यास आणि त्यावर योग्य उपचार लगेच केल्यास, कर्करोग बरा होतो. आम्ही, कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणार्‍या कुटुंबियांना आर्थिक, शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिक आधार पुरवून त्यांचा तणाव व भार कमी करण्यास कटीबध्द‍‍ आहोत.
कर्करोगाबत अद्ययावत आणि अचूक माहिती तसेच कर्करोगाचे व्यवस्थापन, यासाठी कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणार्‍या लोकांना मार्गदर्शन जासकॅप करते. याप्रकारे कर्करोग टाळणे, निदान आणि उपचार याबाबत मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी भारतातील मुंबई शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या टाटा स्मृती रुग्णालयात आम्ही एक पुस्तक-विक्री केंद्र चालवतो. या केंद्राद्वारे अगदी माफक किंमतीत विविध कर्करोग व त्यांच्या उपचारांचे आयोजन या संबंधीची अनेक पुस्तके, पुस्तिका, माहिती पत्रके आणि सलग्न साहित्य वितरीत केले जाते. हे साहित्य हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, तामीळ, मल्याळम आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध आहे. याशिवाय रस असल्यास दृक-श्राव्य सी.डी. आणि डी.व्ही.डी. पण पुरवल्या जातात.
जासकॅप कर्करोगाचे निदान आणि कर्करोगाचा उपचार यासाठी देखील कर्करुग्णांना आर्थिक मदत करते. आम्ही टाटा स्मृती रुग्णालयाच्या सामाजिक सेवा विभागाशी संवाद साधून आथिक सहाय्य वितरीत करतो. टाटा रुग्णालयाच्या शिफारसी खेरीज आम्ही प्रत्येक रुग्णाची गरज तपासून आर्थिक मदत देतो.
आमच्या उपचारासंबंधी आर्थिक मदतीचा प्रमुख हिस्सा कर्करुग्ण असलेल्या लहान मुलांच्या म्हणजेच बाल कर्करुग्णांच्या उपचारासाठी दिला जातो.
याशिवाय जासकॅप कर्करोगाची जाणीव व तो टाळ‍णे याबाबतचे प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यास आर्थिक मदत देते. आमचे अंतिम ध्येय हे टाळता येण्यासारखे कर्करोग टाळले जावेत. आणि ज्यांना कर्करोगाचे निदान व उपचारासाठीचा खर्च स्वतः करणे शक्य नाही, त्यांना मदत करणे असे आहे. कर्करोगाचा भार कर्करुग्ण व त्यांची काळजी घेणारे कुटुंबिय यांच्या समवेत सहानुभूतीपूर्वक उचलणे अशी आमची भूमिका असते.
तसेच कर्करुग्णांना कर्करोगाचे निदान व उपचारांची जटिलता याबाबत व्यवस्थित माहिती देणे या उद्देशाने आम्ही जासकॅप कर्करोग माहिती केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र टाटा-स्मृती रुग्णालयाच्या अगदी जवळच स्थित आहे. या केंद्रात कर्करोगाचा प्रतिबंध, निदान आणि उपचार याबाबत हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम आणि इंग्रजी भाषेत एकटेपणे किंवा लोकांच्या गटाला माहिती दिली जाते. कर्करुग्ण व त्यांची काळजी घेणार्‍यांना, कर्करोगाचे निदान आणि उपचारामुळे निर्माण होणार्‍या तणावांचा सामना कसा करायचा याबाबत समुपदेशन देखील आम्ही देतो.